पाहुणा मारुती मंदिर मेहरूण मध्ये श्री राम मंदिर आणि पोष्ट ऑफिस च्या रस्त्याला आहे. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे या मंदिरातील मूर्ती ही पाण्यात वाहून आली आहे. झाले असे की बऱ्याच वर्ष पूर्वी मेहरूण गावात मेहरुनी नदीला पूर आला होता त्यात बरीच लहान मोठी दगड-धोंडे वाहून आले होते. गावाचे तत्कालीन सरपंचांच्या स्वप्नात मारुती आले, त्यांनी सरपंचांना सांगितले की मी तुमच्या गावात आलोय मात्र माझ्या पाठीवर स्त्रिया धुण धूत आहे. सकाळी गावकर्यांना सोबत घेऊन सरपंचांनी मारुतीची मूर्ती शोधली साडे चार- पाच फुट लांब दगडावर २-३ स्त्रिया धुण धूत होत्या, त्या स्त्रियांना थांबवून तो दगड पालटवून पाहिला तर साक्षात मारुतीची मूर्ती. मग समस्त गावकऱ्यांनी मिळून ती मूर्ती वाजत गाजत गावात आणून तिची स्थापना केली. याच गोष्टी वरून या मारुतीस "पाहुणा मारुती" हे नाव पडले.
(आज महादेव मंदिरा समोर जो नाला वाहतो तो आधी मेहरुनी नदी या नावाने ओळखला जाई. मात्र तांबापुर मधील सांडपाणी त्यात मिसळल्याने नदीचा नाला बनला आहे.)